ताज्या बातम्या
महागाईचा भडका… वाहनधारकांना फटका; पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीने रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मंदावली

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
पेट्रोल आणि डिझेल यांचे विक्रमी दरवाढ झाल्याने रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मंदावली आहे.आधिच कोरोना मुळे हाताला काम नसल्याने जनतेवर आलेली आर्थिक परिस्थिती फार बिकट असल्याने वाहनावर वरती सहजासहजी खर्च करणे सर्वसामान्यांना कठीण बनले आहे.त्यामुळे गाड्यांची वर्दळ मंदावली आहे. अशीच परिस्थिती जैसे-थे राहिली तर मात्र जनतेला नाहक त्रास सोसावा लागणार आहे. सततच्या दर वाढीला सामोरे जावे लागत आहे.
मागील काही दिवसांचा विचार करता शासन स्तरावरून तेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे.
तेलाचे दर गगनाला भिडल्याने वाहन धारकांचे धाबे दणाणले आहेत.आधिच गेले वर्षभर कोरोना मुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने माणसांची आर्थिकदृष्ट्या परिस्थिती बिकट आहे.रोजगार,कामधंदे बंद अवस्थेत असल्याने अनेकजण कामाविना रिकामटेकडे बसून आहेत. आधिच कुटुंब चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असुन वाहनांवरती आणखी कोठून खर्च करावयाचा या संभ्रमावस्थेत आहेत.
तेलाची विक्रमी दरवाढ यामुळे अनेकांनी आपली वाहने घरी – दारी लावणेच पसंत केले आहे. नित्याची व रस्त्यावर न मावणारी वाहने आता थोडी विश्रांती घेताना दिसत आहेत. वाढत्या किमतीने सर्व सामान्यांनी रस्त्यावर न धावणे यातच आपले शहाणपण समजले आहे. पेट्रोल व डिझेलचा हा दर असाच राहिला तर मात्र सर्वच वाहन धारक या महागाईत भरडले जाणार आहेत हे मात्र निश्चित.
शासनाकडून दरवाढ कमी होण्याच्या प्रतीक्षेत वाहन धारक आहेत.तर वायफळ फिरण्यावर मर्यादा आल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.
शेतात वाहना ऐवजी…
तेलाचे दर वाढल्याने शेतात आता मशागतीसाठी वाहना ऐवजी बैल जोडीला महत्व प्राप्त झाले आहे. सर्वच जण चार पैसे कसे बचत होतील या कडे पहात आहे. पुन्हा शेतात बैल जोडीला महत्व प्राप्त झाले आहे.