ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्याला मिळाले नवे गृहमंत्री, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पदभार!

मुंबई प्रतिनिधी :

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh resign ) यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर नव्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याकडे राज्याच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी त्याबद्दलचे पत्र राज्यपालांना पाठवले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असेही या पत्रात म्हटले आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारावे, असा सूर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लगावला होता. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी याआधीही गृहमंत्रिपद सांभाळले होते. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात अनुभवी अशा नेत्याकडे गृहमंत्रिपद द्यावे, असा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. अखेर त्यांच्याकडे गृहमंत्रिपद देण्यात आले आहे.

वळसे पाटील का ?

दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमलेलं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार यांनी केला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks