महाराष्ट्राच्या लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आनंद महिंद्रांनी मोदींच्या लॉकडाऊनमध्ये मात्र थाळ्या पिटल्या

मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारतर्फे लॉकडाऊनचे संकेत देण्यात आले. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत येणाऱ्या 2 दिवसात महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भातील निर्णय जाहीर करू, असं सांगितलं. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्रातील या लॉकडाऊनला पूर्णपणे विरोध दर्शवला आहे. यावरून शिवसेनेतर्फे त्यांच्यावर टीकेची तोफ डागण्यात आली आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आनंद महिंद्रा यांच्या महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या विरोधावरून त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यावर टीकेची झोड उठवली. “महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारताची गती मंदावली असून राजकारणाचा वेग मात्र जोरात आहे, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेचे तीन टप्पे पार पडले, हजारोंचे रोड शो झाले आणि राजकीय सभांमध्ये कोरोनाचा लवलेशही आढळला नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“आनंद महिंद्रासारख्या उद्योगपतींनी महाराष्ट्रातील लॉकडाऊनला विरोध केला. पण गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय लॉकडाऊनमध्ये ते सामील झाले आणि टाळ्या-थाळ्या पिटण्याचा आनंदही त्यांनी साजरा केला.” असा खोचक टोला संजय राऊत यांनी उद्योगपती आनंद महिंद्रा यांना आपल्या अग्रलेखातून लगावला आहे. घंटा बडवून, अजान देऊन कोरोना थांबणार नाही, कारण कोरोनाचा संबंध कोणत्याही जाती-धर्माशी नाही आणि कोरोना ही अंधश्रद्धा वगैरे नसून एक मोठं संकट आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या अशा आवाहनाने कोरोना गेला नाही, असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला 21 दिवस द्या 21 दिवसात कोरोेनाला हरवू, असं भारताच्या जनतेला म्हटलं होतं. पण आता एक वर्ष होऊनही कोरोनाचं संकट देशावरून जात नसल्याचं दिसून येत आहे. अशी टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. तसेच पुन्हा लाॅकडाऊन नको ही आनंद महिंद्रा यांची भावनाही चुकीची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.