ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील लॉकडाऊन निर्बंध 15 जूनपर्यंत कायम ठेवणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई :

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे दिसत असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. तर, राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी उद्या संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. ”जनतेवर निर्बंध लादावे लागतात या सारखं दुसरं कटू काम नाही, असं मला वाटत नाही. पण ते मला नाईलाजाने करावं लागत आहे. आपल्या राज्याच्या व सर्वांच्या जीवाच्या काळजी पोटी करावं लागत आहे.” असं मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.
तसेच, सुरूवातीला त्यांनी, जिद्दीनं आणि निश्चयानं बंधनं पाळल्याबद्दल धन्यवाद.. असं म्हणत जनतेचे आभारही मानले. याचबरोबर, आता आपण निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नाही. असंही ते म्हणाले. याशिवाय, तौते वादळग्रस्तांना मदत देण्यास सुरूवात होत असल्याचंही सांगितलं.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ”काहीजण असं म्हणत आहेत की लाट आता ओसरत आहे, मग आता काय करणार हे निर्बंध उठवणार का? याबाबत देखील तुम्हाला माहिती देण्याची आवश्यकता वाटते, की नेमकं आपण कुठं आहोत? आज राज्यात १८ हजारांच्या आसपास रूग्ण संख्या आहे. मात्र दोन-चार दिवसांअगोदरचा आकडा पाहिला तर, गेल्या लाटेत जी सर्वोच्च संख्या होती. तिच्या तुलनेत आता थोडीशी कमी होते आहे. त्यावेळी आपण जे शिखर गाठलं होतं. ते सणासुदीच्या नंतर गाठलं होतं. यंदा ही परिस्थिती सणासुदीच्या अगोदर आलेली आहे. १७ ते १९ सप्टेंबर २०२० मध्ये राज्यात साधारण एका दिवसात आढळणारी रूग्ण संख्या ही २४ हजार होती. आता २६ मे रोजी २४ हजार ७५२ एवढे रूग्ण आढळलेले आहेत. आज साधारण ही संख्या १८ हजारापर्यंत आली आहे. म्हणजे अजूनही आपण म्हणावं तेवढं खाली आलेलो नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे यावेळी रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे आता आपण निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नाही. मात्र आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रूग्ण संख्या थोडीशी वाढताना दिसत आहे. ही जरा काळजीची बाब आहे. कारण, शहरी भागात हे प्रमाण कमी होताना दिसत असलं तरी ग्रामीण भागात हे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे ताबडतोब थांबणं आवश्यक आहे.”

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks