खासगी रुग्णालयांनी बेड मॅनेजमेंट डॅशबोर्ड अपडेट करावा -पालकमंत्री सतेज पाटील

रोहन भिऊंगडे /
कोल्हापूर, दि.27- जिल्हा प्रशासनाने तयार केलेला बेड मॅनेजमेंट डॅशबोर्ड खासगी रुग्णालयांनी वेळच्यावेळी अपडेट करावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहूजी सभागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूर मेडीकल असोशिएशन, खासगी रुग्णालयांचे डॉक्टर्स यांच्याशी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज बैठक घेतली. पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी केंद्र सुरु करण्याच्यादृष्टीने जास्तीत-जास्त खासगी रुग्णालयांनी कोवीन पोर्टलवर आपली नोंदणी करावी. लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तींसाठी आवश्यकतेनुसार मांडव उभा करावा. जेणेकरुन त्यांची उन्हापासून सोय होईल. लसीकरणाबाबत सूचना देण्यासाठी पब्लिक ॲड्रेस यंत्रणा सुरु करावी. केंद्रावर पिण्याच्या पाण्यासह आवश्यक त्या सुविधा कराव्यात. स्पीकर यंत्रणा ठेवावी.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, खासगी रुग्णालयांचे ऑक्सीजन, स्ट्रक्चरल, फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडीट करण्यासाठी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे. असणाऱ्या त्रुटी पूर्ण करा. टास्कळ फोर्सच्या सदस्यांनाही रुग्णालयांचे वाटप करण्यात येईल. बेडचे व्यवस्थापन,ऑक्सीजन आणि रेमडिसिवीर चा वापर याबाबत ते रुग्णालय व्यवस्थापनेचे समुपदेशन करतील. खासगी रुग्णालयांनी लसीकरण केंद्राच्या नोंदणीसाठी पुढे यावे, असेही ते म्हणाले.
नोडल अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करुन पोर्टलवर कशा पद्धतीने नोंदणी करायची, लसीचे नियोजन करुन माहिती कशी भरायची याबाबत सविस्तर माहिती दिली.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, डॉ. उषादेवी कुंभार, तहसीलदार अर्चना कापसे, रंजना बिचकर आदी उपस्थित होते.