गोडसाखरेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पूर्ण देणी अदा

गडहिंग्लज प्रतिनिधी:(सोहेल मकानदार)
गोडसाखर हा साखर कारखाना ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीने आठ वर्षे चालविला. या काळात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सर्व म्हणजे दीड कोटीची देणी कंपनीने पूर्ण आदा केली आहेत. या कंपनीचे आणि विशेषता ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन, असे गौरवोद्गार माजी जिल्हा परिषद सदस्य गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेचे प्रमुख शिवाजी खोत यांनी काढले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले, असेही ते म्हणाले.याबाबत अधिक माहिती अशी, कंपनीने २० फेब्रुवारी रोजी ७५ लाखांचा धनादेश व आज ७५ लाखांचा धनादेश सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिला.यावेळी बोलताना श्री. खोत म्हणाले, चार जानेवारीपासून ११० दिवस हे आंदोलन सुरू होते. हलाखीत असलेल्या कामगारांचा दहा वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सोडविला. हा कारखाना ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीने चालवावा अशी गडहिंग्लज तालुक्यातील तमाम शेतकरी सभासदांची व कामगारांची ही भावना होती. यासाठी आम्ही बरेच प्रयत्नही केले. परंतु; यामध्ये कंपनीसह मंत्री हसन मुश्रीफ यांचाही नाइलाज झालेला दिसतोय, असेही ते पुढे म्हणाले.यावेळी चंद्रकांत बंदी, सुभाष पाटील, रणजीत देसाई, बाळासाहेब लोंढे, महादेव मांगले आदी प्रमुख उपस्थित होते.