शिक्षकनेते बी एस खामकर यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार ; महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने राज्य अधिवेशनात होणार सन्मान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र शिक्षक आघाडी (टीडीएफ) या राज्यस्तरीय शिक्षक संघटनेचा राज्यस्तरीय “जीवन गौरव पुरस्कार 2025” जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिक्षक नेते बी.एस.खामकर (मुरगूड) यांना जाहीर झाला आहे. पालघर या ठिकाणी 26 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, शिक्षण मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सावरा, शिक्षक नेते जी के थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित करण्यात येणार आहे.
श्री खामकर यांच्या शिक्षण क्षेत्रातील संघटनात्मक कार्य, अध्यापन व सामाजिक प्रबोधन क्षेत्रातील कार्याचा विचार करून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजीचे ते स्वीकृत सदस्य या पदावर कार्यरत असून इंग्रजी भाषा राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे. यापूर्वी त्यांना जिल्हा परिषद कोल्हापूरचा “आदर्श शिक्षक पुरस्कार 2002″ व रोटरी क्लब कोल्हापूर यांचा “सनराइज आदर्श शिक्षक” पुरस्कार 2005 मिळालेला आहे.
कागल तालुक्यातील मळगे विद्यालय ज्युनियर कॉलेज या ठिकाणी ते सहाय्यक शिक्षक म्हणून 32 वर्षे कार्यरत होते. शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी शिक्षण अधिकारी संचालक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन,सत्याग्रह अशा विविध मार्गाने प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.त्यांच्या या संघटनात्मक कार्याची दखल राज्यस्तरीय पुरस्काराने घेण्यात आली आहे त्याबद्दल परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिक्षक नेते बी. डी. पाटील व जी.के.थोरात यांच्या नेतृत्वाखाली श्री खामकर कार्यरत आहेत.