मुख्यमंत्र्यांना मुस्लिम समाजाकडून मोलाची साथ, रोजे असूनही पुरुष, महिलांनी केले रक्तदान

मुंबई :

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला मुस्लिम समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत वर्सोवा, यारी रोड प्रभाग क्रमांक 59 च्या युवा अल्पसंख्याक समाजाची मोलाची साथ मिळाली. सध्या सुरू असलेल्या रमझानच्या पवित्र महिन्यात अल्पसंख्याक बांधवांसह समाजातील महिलांनीही मोठा सहभाग घेतला आणि मध्यरात्रीपर्यंत रक्तदान करून एक आदर्श ठेवला. यावेळी बाळासाहेब ठाकरे ब्लड बँकेच्या पथकाने २०७ युनिट रक्त संकलन केले.
सध्या मुंबईत ठिकठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन साधारणपणे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत केले जात आहेत. मात्र येथील युवा अल्पसंख्याक समाजाने क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य अजय कौल यांच्या मार्गदर्शनाखाली यारी रोड वर्सोवा अल्पसंख्याक समाजाच्यावतीने रोझा सोडल्यानंतर प्रथमच काल (दि.24) रात्री उशिरापर्यंत रक्तदान शिबीर आयोजित केले. मुंबईसह राज्यातील अशा प्रकारे मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या रक्तदान शिबीराची पहिलीच घटना आहे, अशी माहिती पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष व वर्सोवा विधानसभा संघटक यशोधर फणसे यांनी दिली.
परिवहनमंत्री व विभागप्रमुख अनिल परब यांनी रात्रीच्या वेळेस रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे तसेच यारी रोड वर्सोवा अल्पसंख्याक समाजाचे व प्राचार्य अजय कौल यांचे मनापासून आभार मानले. रक्तदानाच्या दिशेने तरुणांचा विशेष सहभाग होता. युवाशक्ती हा देशाचा विजय आहे आणि अशी उदात्त कामे करून या तरुणांनी समाजाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या तरुणांनी समाजाला नवी दिशा दिली आहे, हे एक स्तुत्य पाऊल आहे, असे यावेळी अनिल परब म्हणाले.