ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेणा-मुतात राबणाऱ्या माता-भगिनींना सोन्याची भाऊबीज करू – मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; कागलमध्ये गोकुळ दूध संघ प्रचारार्थ राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचा प्रचार

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे

गोकुळ दूध संघाची सत्ता द्या. शेणा-मुतात राबणाऱ्या माता-भगिनींना सोन्याची भाऊबीज करू, असे प्रतिपादन ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचारात ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, सत्ताधारी ३, १३ आणि २३ तारखेला दूध बिले देत असल्याचे सांगत आहेत. गवळीसुद्धा दहा दिवस झाले की बिल देतो. यामध्ये तुम्ही नवीन काय केलं? तुमचा कारभार जर एवढा चोख आणि दूध उत्पादकांच्या हिताचा असेल तर मग निवडणुकीची भीती तुम्हाला का वाटते? असा सवालही मंत्री मुश्रीफ यांनी केला.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, महादेवराव महाडिक यांना आम्ही सतत टँकर बद्दल विचारत होतो. काल त्यांनी आपले ४० टँकर असल्याची जाहीर कबुली दिली. ज्या ज्या संस्थांना त्यांचा स्पर्श झाला त्या सगळ्या संस्था बुडाल्या आहेत. त्यांच्या घशातुन दूध संघ काढून, तो सर्वसामान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्यासाठीच आमची ही लढाई आहे.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, सत्ताधारी आघाडीचे नेते गोकुळ दूध संघ स्वतःच्या खाजगी मालकीचा करायला निघाले होते. परंतु, जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या जनरेट्यामुळेच तो निर्णय मागे घ्यावा लागला. गोकुळ दूध संघाचा वाहतूक ठेकेदारच सगळं मीच केलं म्हणतोय. ही प्रवृत्ती मोडूया, असेही ते म्हणाले.

पी. एन. साहेब मी सांगत होतो तेच खरं झालं……
श्री. मुश्रीफ म्हणाले, गोकुळची निवडणूक महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र लढवावी, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे पी. एन. पाटीलसाहेबांच्या बरोबर चर्चाही सुरू होती. त्या चर्चेमध्ये पी एन साहेबांना म्हणालो होतो, साहेब तुम्ही म्हणता तसे होणार नाही. सत्तारूढ गटातील पॅनेलमध्ये तुमचा वरचष्मा राहणार नाही. यावर पी. एन. साहेब यांनी अतिशय आत्मविश्वासाने, आपण सांगेल तेच होईल, असे सांगितले होते. पॅनेल जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी ज्या बातम्या दिल्या त्या पाहिल्यानंतर व वस्तुस्थिती पाहिल्यानंतर पी. एन. साहेब या पॅनेल रचनेमध्ये तुमचा वरचष्मा राहिला नाही. दुर्दैवाने, माझं खरं ठरलं!

परिवर्तनाची शपथ घेऊया………

श्री. मुश्रीफ म्हणाले, गेली २५ ते ३० वर्षे सातत्याने गोकुळबाबत टिका व चर्चा असते. ती म्हणजे उधळपट्टी आणि प्रचंड खर्चाची. उदाहरणार्थ: वासाचे दुध काढणे, दुधाची योग्य किंमत न देणे, मोठ्या लोकांच्याच टँकरना पाळी देणे, नोक-यांमधील वरकमाई, मुंबई व पुण्याच्या दुध विक्री एजंटकडून वरकमाई घेतात अशा अनेक तक्रारी आहेत. आता हे सगळ बंद करूया. शपथ घेवूया व परिवर्तन करूया.
स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात भैया माने यांनी आघाडीच्या उमेदवारांची ओळख करून दिली. उमेदवार विश्वास नारायण पाटील व अरुण डोंगळे यांचीही भाषणे झाली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जि. प. सदस्य युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, विजय देवणे, विश्वास पाटील, अरूण डोंगळे, शशिकांत पाटील – चुयेकर, नविद मुश्रीफ, विरेंद्र मंडलिक, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, कागलच्या नगराध्यक्षा सौ. मानिक माळी, शिवाजी कांबळे यांच्यासह सर्वच उमेदवार व प्रमुख मान्यवर उपस्थित होते. आभार मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks