प्रभू श्रीरामांचा विचार कृतीत आणणे हाच खरा परमार्थ : संत साहित्याचे युवा अभ्यासक ह भ प सचिनदादा पवार यांचे प्रतिपादन ; अयोध्या मंदिर वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त कागल मध्ये आनंद सोहळा

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
प्रभू श्रीरामांचा विचार कृतीत आणणे हाच खरा परमार्थ आहे. जनतेला जनार्दन मानणे हाच रामरायांचा संदेश आहे. लोकनेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी तो आचरणात आणला आहे, असे प्रतिपादन युवा संत साहित्य अभ्यासक व सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प सचिनदादा पवार यांनी केले.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर वास्तुशांती सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित आनंद सोहळ्यात आयोजित कीर्तनात ते बोलत होते. नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री मुश्रीफ यांच्यासह विद्यापीठ विकास मंचचे केशव गोवेकर, शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परुळेकर, मधुकर भोसले आदी उपस्थित होते.
कीर्तनात श्री. पवार पुढे म्हणाले, संकुचित लोक भक्तीपेक्षा इतर बाबी पाहतात. वारकरी जात, पात, पंथ असा कोणताही भेद पाहत नाही. द्वेष ईर्षा असता कामा नये. राजकारणात बोलघेवडेपना नाही तर कृती लागते. नाथ भागवतात म्हंटले आहे की, एक मंदिर बांधल्यावर पुढच्या जन्मी चक्रवर्ती सम्राट होतो, मंत्री श्री. मुश्रीफ यांनी तर 750 मंदिरे बांधली आहेत.
ते पुढे म्हणाले, प्रभु श्री. रामाला धर्म व पंथात अडकवायचे नाही. रामाचा विचार कृतीत आणणे हा खरा परमार्थ होय. कागलच्या कोणत्याही शेवटच्या गावापर्यंत डांबरी रस्ता आहे, आरोग्याची मोठी सेवा केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर शिव-स्वराज्याची भगवी गुढी उभारण्याचा निर्णय मंत्री श्री. यांनी घेतला. मिळालेले राज्य गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी वापरायचे असते, तेच काम ते कसोटीने करताहेत. जर समाजाची सेवा करायची असेल तेव्हा व्यक्तिगत कुटूंब नसते. जनता हेच त्यांचे कुटूंब आहे. सर्वसामान्य माणसाच्या मागे उभे राहणे महत्वाचे.
हीच खरी पुण्याई…….!
सचिनदादा पवार म्हणाले, रामराज्य म्हणजे जनतेची सेवा,वंचितांचे अश्रू पुसण्याचे काम. आधुनिक काळात लोकशाहीची गंगा शेवटच्या माणसापर्यंत गेली पाहिजे. मंत्री श्री मुश्रीफ यांनी जनसेवेच्या माध्यमातून परमार्थ साधलेला आहे. भावाने सोडून दिलेल्या व्यक्तीला दवाखान्यात उपचार करून त्याला सुखरूप घरी आणून सोडणे यालाच पुण्याई म्हणतात. हीच पुण्याई वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी प्राप्त केली आहे.