ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : महायुतीत जागावाटपाचा गुंता सुटला ? अमित शहांची मध्यरात्री मुंबईत बैठक, भाजपची महाराष्ट्रातील यादी येणार

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. भाजपसह सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे, काही जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा केला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठक झाली असून या बैठकीत जागावाटपाचा गुंता सोडवल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. महाराष्ट्रातील जागावाटपाच्या वादावर अमित शहा यांनी रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. केंद्रीय मंत्री अमित शाह जागावाटपाबाबत आजही बैठक घेणार असल्याचे बोलले जात आहे, आजच्या बैठकीनंतर भाजच्या उमेदवारांची दुसरी यादी समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.

व्यवहार्य तोडगा काढा, हट्ट नको ; जागावाटपावर गृहमंत्री अमित शाह यांचा एकनाथ शिंदे – अजित पवार यांना सल्ला

लोकसभा उमेदवारांबाबत आज ६ मार्च रोजी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यादरम्यान पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारच्या उर्वरित जागांसाठी उद्या आणि परवा असे दोन दिवस चर्चा होणार आहे. या बैठकीला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहू शकतात. कोअर कमिटीच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी नावांवर विचारमंथन होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक दिग्गजांना बाजूला करण्यात आले. आता दुसऱ्या यादीबाबतही चर्चा रंगली आहे. दुसऱ्या यादीत पक्ष मोठ्या प्रमाणात तिकीट कापू शकतो, असे मानले जात आहे.

महायुतीमध्ये या जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा….
दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, शिरूर, मावळ, गडचिरोली, नाशिक, पालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, अमरावती, माढा, सातारा या लोकसभा मतदार संघात दोन्ही पक्षांकडून दावा सांगितल्याचे बोलले जात आहे.

जिंकून येण्याच्या निकषावर जागावाटप…
४८ जागांचे महायुतीत कसे वाटप करायचे, या संदर्भातही शाह यांनी यावेळी चर्चा केल्याची माहिती आहे. ज्याचे खासदार त्याला संधी, असे सूत्र न ठेवता आगामी निवडणुकीत जिंकून येणारा उमेदवार कोणाकडे आहे हे बघितले पाहिजे. शिवसेनेकडे जे १३ खासदार आहेत त्या सगळ्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जाते. त्यापैकी एक किंवा दोन मतदारसंघ भाजपला मिळतील आणि त्या मोबदल्यात एक दोन नवे मतदारसंघ शिंदे यांच्याकडे जाऊ शकतील, अशीही शक्यता आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks