ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टँक,सिलिंडरचे त्वरित ऑडीट करा खासगी, शासकीय रूग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

रोहन भिऊंगडे /
कोल्हापूर, दि. 22 : जिल्ह्यातील खासगी व शासकीय कोव्हिड रूग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेला टँक /सिलिंडरव्दारे ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे त्वरित ऑडीट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आज राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उप जिल्हा रूग्णालय गडहिंग्लज, इंदिरा गांधी जनरल हॉस्पिटल इचलकरंजी, पायोस हॉस्पिटल जयसिंगपूर, ॲपल सरस्वती मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, ॲस्टर आधार हॉस्पिटल, अथायू हॉस्पिटल उजळाईवाडी, डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल, सुशीलदत्त हॉस्पिटल इचलकरंजी, सिध्दगिरी हॉस्पिटल कणेरीवाडी व सर्व कोव्हिड रूग्णालये यांना पत्र पाठविले आहे.
संबंधित रूग्णालयातील ऑक्सिजन टँक तसेच त्याचा पुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेली पाईपलाईन पाईप व्हॉल्वस, सिलींडर यंत्रणा हे सर्व सुरक्षित आहेत का. या ठिकाणी कोणताही ज्वालाग्राही पदार्थ तसेच गळतीबाबत खात्री करावी. असे आढळल्यास त्वरित अशा धोकादायक गोष्टी या ठिकाणाहून हटवाव्यात. अशा ठिकाणी ऑक्सिजन टँकच्या/ सिलींडरच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात. ज्या ठिकाणी लिक्वीड ऑक्सिजन टँक/ ऑक्सिजन जनरेटर आहे त्या ठिकाणी त्वरित सी.सी. टिव्ही लावावेत व त्याचे नियंत्रण रूग्णालय व्यवस्थापकांच्या कक्षातून करावे. रूग्णालयातील अंतर्गत वायरिंगची त्वरित सुरक्षा तपासणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी नवीन वायरिंग करून घ्यावे. तसेच प्रत्येक ठिकाणी अग्नीशमन यंत्रणा आस्थापित करावी, असेही यात म्हटले आहे.