कागल तालुक्यातील करंजीवणे येथे शॉर्टसर्किटने आग लागून १६ गवत गंजी जळून खाक

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
करंजीवणे (ता. कागल) येथे शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे १६ गवत गंजी जाळून खाक झाल्या. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.
करंजीवणे येथील माळरानावर काही शेतकऱ्यांनी जनावरांसाठी गवत गंजी रचून ठेवल्या होत्या. गुरुवारी दुपारी अचानक गवत गंजीला आग लागल्याचे निदर्शनास येताच काही शेतकऱ्यांनी गायरानाकडे धाव घेतली. परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेतकऱ्यांना आग विझविणे अवघड झाले होते.
यावेळी काही युवकांनी मुरगूड नगरपालिका, मंडलिक साखर कारखाना व बिद्री कारखाना येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमनची गाडी येईपर्यंत काही युवकांनी धाडसाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला.
या आगीमध्ये पुंडलिक गोजारे, मधुकर गोजारे, पांडुरंग भोसले, बंडा लाड, पांडुरंग चव्हाण, शिवाजी बाबर, नारायण चव्हाण, नंदकुमार मसवेकर, सुमन बाबर आदींचे मोठे नुकसान झाले. यावेळी सरपंच उत्तम बैलकर, आदींसह ग्रामस्थ युवकांनी शर्थीने आग आटोक्यात आणली.