कोल्हापूर : केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत पाटाकडीलला विजेतेपद तर शिवाजी तरुण मंडळ ठरला उपविजेता संघ

केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत गोल फरकाच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळाने विजेतेपद पटकावले. शिवाजी तरुण मंडळाने उपविजेतेपद मिळविले. दरम्यान शेवटच्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने दिलबहार तालीम मंडळाचा 4-0 असा पराभव केला. विजेता संघ पाटाकडील तालीम मंडळास रोख 1 लाख रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले.
उपविजेता शिवाजी तरुण मंडळाला रोख 75 हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले. तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या बालगोपाल 50 हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेत शिवाजी आणि पाटाकडील या दोन्ही संघांचे 17 गुण झाले. पण गोलफरकाच्या जोरावर पाटाकडील संघांने बाजी मारली. आज सोमवारी स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाला मोठ्या फरकाने विजयाची गरज होती.
सामन्याच्या सुरवातीपासून शिवाजी संघाने वेगवान खेळ केला. पूर्वार्धात सातव्या मिनिटाला शिवाजीच्या करण चव्हाणने मैदानी गोल करत संघाचे खाते खोलले. त्यानंतर शिवाजीने वेगवान चढाया करत दिलबहार संघावर दबाव कायम ठेवला. शिवाजीच्या इंद्रजीत चौगुलेने 17 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. मध्यंतरास शिवाजी संघ 2-0 असा आघाडीवर होता.
उत्तरार्धात शिवाजी संघांने चढायाचा धडाका वाढवला. शिवाजीच्या आघाडी फळीतील खेळाडूला डी मध्ये रोखल्याने मुख्य पंचानी शिवाजी संघास पेनल्टी बहाल केली. करण चव्हाण बंदरे याने सुवर्ण संधीचा फायदा घेत अचूक पेनल्टी मारत वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केला. 72 व्या मिनिटाला शिवाजीच्या संकेत साळोखेने हेडद्वारे गोल केला. पूर्ण वेळेत चार गोलची आघाडी कायम टिकवत शिवाजी संघांने सामना जिंकला.
बक्षीस वितरण श्रीमंत शाहू छत्रपती आणि राज्याचे महसूल व वनखात्याचे अतिरिक्त सचिव राजगोपाल देवरा यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे, शहर पोलिस उप अधीक्षक अजित टिके, विफा महिला विभागाच्या अध्यक्ष मधुरिमाराजे, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, सह सचिव प्राध्यापक अमर सासने,फुटबॉल सचिव राजेंद्र दळवी, नंदू बामणे, संभाजी मांगोरे पाटील,नितीन जाधव, प्रदीप साळोखे,, दीपक घोडके आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू- बेस्ट फाॅरवर्ड राकेश सिंग. बेस्ट गोलकीपर मयुरेश चौगुले.बेस्ट हाफ ओंकार पाटील. बेस्ट डिफेन्स जय कामत यांना सन्मानित करण्यात आले.