पुढच्या काही तासांत महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे स्पष्ट एकमत!

मुंबई
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पुर्ण लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज किंवा उद्या महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सुतोवाच केले आहे. आज ( २० एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी सर्व नेत्यांनी आपल्या जिल्ह्यातील स्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. त्यामुळे लॉकडाऊन लावावा असाच सर्व मंत्र्यांचा आग्रह असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता लॉकडाऊन बाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, १५ दिवसांची संचारबंदी राज्यात लागू आहेच. तसेच, किराणा मालदाची दुकाने आणि अन्य अत्यावश्यक गोष्टींची दुकाने सकाळी ७ ते ११ याच वेळेत सुरु राहणार असल्याची नियमावली आज जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आज किंवा उद्या महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन होणार असल्याचे संकेत मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. १५ दिवसांचा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.