ताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी छापा टाकून केली अटक

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे

एकीकडे जिल्ह्यात रोज करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा भासत असताना, त्याचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी छापा टाकून अटक केली. यातील तिघे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा भासत आहे. गेले काही दिवस रोज चारशे ते पाचशे करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रोज दीड हजारांवर इंजेक्शनची गरज असताना प्रत्यक्षात मात्र पुरवठा अतिशय कमी आहे. मिळेल त्या किंमतीत सध्या नातेवाइक हे इंजेक्शन मिळवत आहेत. पण काही ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी छापा टाकून दोघांना अटक केली आहे.
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सकाळी शाहूपुरी परिसरात छापा टाकला. यावेळी योगीराज राजकुमार वाघमारे आणि पराग विजयकुमार पाटील या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ११ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. १८००० रुपयांना एक इंजेक्शन हे दोघे विकत होते. यातील तीन आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गेले काही दिवस कोल्हापुरात इंजेक्‍शनचा प्रचंड तुटवडा भासत आहे. त्यामुळे योग्य वेळी इंजेक्शन न मिळाल्याने मृत्यूची संख्याही वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यात ३४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. मृत्यूचा उच्चांक सोमवारी गाठला. अशा परिस्थितीत रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवण्यासाठी नातेवाइकांची धडपड सुरू असताना, दुसरीकडे मात्र काळाबाजार सुरू असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks