निढोरीत कावीळची साथ, पंधरा रुग्ण सापडले; आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष.

कळे : अनिल सुतार
कागल तालुक्यातील निढोरी येथे कावीळ साथीने थैमान घातले असून दि १० जानेवारी पर्यंत एकूण पंधरा कावीळ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून ही संख्या वाढतच आहे. यामध्ये सर्वच रुग्ण शालेय विद्यार्थी असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
गावातील पिण्याच्या पाण्यातुन जंतुसंसर्ग होऊन कावीळची साथ वाढली असून एक डेंग्यूचा रुग्ण सापडला आहे.गावातील अस्वच्छ व तुंबलेली गटारे यामुळे डासांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच गटारांवर कोणतीही डास व जंतु प्रतिबंधक पावडर वेळच्या वेळी फेकली जात नाही की गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये टिशेल पावडरचा अभाव यामुळे या गावातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
यासंदर्भात विचारणा केली असता आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभाग हे एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तसेच ग्रामपंचायत व आरोग्य विभागातील कर्मचारी हे सुद्धा फक्त सर्व काही आलबेल असल्यासारखे वागत आहेत.
त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाच्या कारभारावर नागरिकांतून संताप व्यक्त होत असून गाफिलपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.