ताज्या बातम्यामहाराष्ट्र

धामणीखोऱ्यात मोबाईल कंपन्यांचा मनमानी कारभार खुदाईमुळे पावसात दलदलीचे साम्राज्य,वाहतूक धोकादायक, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; जनतेतून संताप.

कळे : अनिल सुतार

धामणी खोऱ्यात गेल्या दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे खासगी मोबाईल कंपन्यांनी नेटवर्क केबलसाठी रस्त्याकडेने खुदाई केलेल्या चरातील माती थेट रस्त्यावर वाहून आल्याने खोऱ्यातील रस्ते चिखलमय झाले आहेत.परिणामी खोऱ्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनले असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.मोबाईल कंपनीच्या या मनमानी प्रकाराकडे संबंधित बांधकाम विभागांनी दुर्लक्ष केले असून ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे का? असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होत आहे.

राधानगरी,पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील विस्तारलेल्या धामणी खोऱ्यात खासगी मोबाईल कंपन्यांची ५ जी नेटवर्क केबल टाकण्यास गेल्या दोन महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांच्या लगत व काही ठिकाणी रस्ता मधोमध फोडून खुदाई केली आहे.मात्र ठेकेदाराने मनमानी करत खुदाई करताना रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून नेणारी व्यवस्था असणारे नाले मुजवून टाकले आहेत. परिणामी गेल्या दोन दिवसापासून धामणी खोऱ्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाने बाजूची माती थेट रस्त्यावर वाहूून आल्याने दलदल होऊन चिखल झाल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे.

दोन महिन्यापासून खुदाई करताना संबंधित ठेकेदारांनी प्रवासी, जनता व रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने रस्त्यावरून उडणाऱ्या धुरळ्याने जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असतानाही ठेकेदारांना संबंधित विभागानीं पाठीशी घातल्याची चर्चा आहे.त्यातच गेल्या दोन दिवसापासून परिसरात पडणाऱ्या पावसामुळे धामणी खोऱ्यातील मुख्य मार्गासह गवशी बंधारा (ता.राधानगरी), आंबर्डे बंधारा (ता.पन्हाळा)तसेच वेतवडे ते म्हासुर्ली व परखंदळे ते हरपवडे यासह अनेक रस्त्यांवर खुदाई केलेल्या ठिकाणी दलदल झाल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे.

अवकाळी पावसामुळे रस्त्यावर दलदल होऊन चिखल निर्माण झालेला असतानाही संबंधित ठेकेदार व शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग व जि.प बांधकाम विभाग सुस्त असून सुरक्षितेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.संबंधित प्रकाराकडे या भागातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

धामणी खोऱ्यातून सध्या मोठ्या प्रमाणात ऊसासह इतर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून पावसामुळे माती रस्त्यावर वाहून आल्याने दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.परिणामी वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.तर मोटरसायकल व इतर वाहनांतून प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याचे चित्र असून अशा रस्त्यावरून प्रवास करताना जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.तरी शासनाच्या संबंधित विभागांनी जनतेच्या व वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्ते स्वच्छ करण्याबरोबर मजबूत करावे लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks