जोतिबा यात्रेवर कोरोनाचं सावट; यात्रेतील 5 मानकरीच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने यात्रा रद्द

रोहन भिऊंगडे /
कोल्हापूर
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात लोकांची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 26 एप्रिल म्हणजेच उद्या होणारी जोतिबा यात्रा रद्द करण्यात आली आहे.
सोमवार 26 एप्रिल रोजी कोल्हापूरच्या जोतिबाच्या डोंगरावर होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेतील मानकऱ्यांपैकी 5 मानकरी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ही यात्रा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे जोतिबा डोंगरावर अगदी मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रा पार पडणार होती.
खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून मानकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. पण त्यातून धक्कादायक गोष्ट समोर आली कारण तब्बल 5 जण कोरोना बाधित असल्याचे त्यातून स्पष्ट झालं. त्याच पार्श्वभूमीवर आता जोतिबाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचं सावट यावर्षी जोतिबा यात्रेवरही आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापुरातील प्रशासनाने जोतिबा कडे जाणारी सर्व मार्ग आणि डोंगराकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना ही आता जोतिबा डोंगरावर प्रवेश मिळणार नाही. यापूर्वीही अनेक कार्यक्रम आणि समारंभ कोरोनामुळे रद्द करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर अवघ्या काही लोकांमध्येच पार पडणारा हा समारंभही नाईलाजाने प्रशासनाला रद्द करावा लागत आहे.