कोरोनाने देशात सुरु केलेल्या हाहाकारामुळे जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलली

पुणे ऑनलाईन :
आयआयटीसह अन्य इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट मेन अर्थात जेईई मेन्सची एप्रिल सत्र परीक्षा (JEE Main April Session 2021) पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली.
जेईई मेन्स परीक्षा २७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत ही परीक्षा घेण्यात येते. रमेश पोखरियाल यांनी ट्विट केले आहे की, ‘कोरोना विषाणू संसर्गाची सद्यस्थिती पाहता मी एनटीएला सल्ला दिला होता की एप्रिलमध्ये होणारी जेईई मेन्स परीक्षा स्थगित केली जावी. आपल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांचे करिअर महत्त्वाचे आहे.
त्या पार्श्वभूमीवर एनटीएद्वारे जारी केलेल्या पत्रात लिहिलंय की ‘कोविड-१९ महामारीची वर्तमान स्थिती पाहता उमेदवार आणि परीक्षा अधिकाऱ्यांची सुरक्षा ध्यानात घेऊन जेईई मेन्स एप्रिल सत्र परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनटीएने असेही सांगितले आहे की नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना परीक्षेआधी किमान १५ दिवसांचा अवधी मिळेल.
दरम्यान, यापूर्वी सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे तर बारावीची परीक्षा लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्रातही दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या परिक्षांबरोबर विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यास सुरूच ठेवावा लागणार आहे. दरम्यान जेईई मेन्स परीक्षा चार वेळा घेण्यात येत आहे. यातील पहिली परीक्षा 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पार पडली ही परीक्षा 6 लाख 20 हजार 978 विद्यार्थ्यांनी दिली तर दुसरी परीक्षा 16 ते 18 मार्च दरम्यान पार पडली असून ही परीक्षा 5 लाख 56 हजार 248 विद्यार्थ्यांनी दिली असल्याची माहिती एनटीए ने दिली आहे.