कागल तालुक्यातील खडकेवाडा येथे गोबरगॅसच्या खड्यात पडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू

कागल तालुक्यातील खडकेवाडा येथील पृथ्वीराज प्रशांत कोराणे (वय ३) या बालकाचा खेळत खेळत जाऊन घरामागील गोबरगॅसच्या खड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. एकुलत्या मुलाच्या अकाली मृत्यूबाबत ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे.
गुरुवारी दुपारी १२ वाजता पृथ्वीराज हा घरामागे असणाऱ्या पडसर जागेत खेळत होता. नजरचुकीने तो खेळत खेळत गोबरगॅसच्या शेणखतासाठी असणाऱ्या खड्ड्यात पडला. तो दिसेनासा झाल्यामुळे घरातील व्यक्तींनी शोधाशोध केली. यावेळी या खड्ड्यातून बुडबुडे येत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी काही युवकांनी काठीच्या साहाय्याने शोधाशोध केली. यावेळी हा बालक आढळून आला. त्याला उपचारासाठी निपाणी आणि तेथून कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पंजोबा, आजोबा, आजी, आई,वडील असा परिवार आहे.