ताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘ब्रेक द चेन’ आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर, : रोहन भिऊंगडे

जिल्ह्यात ब्रेक द चेन आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशान्वये संचारबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. कोरोनाची साखळी तोडून जिल्ह्याला सुरक्षित ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
ब्रेक द चेन आदेशाची प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहूजी सभागृहात दूरदृश्यप्रणालीद्वारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी यांची बैठक घेतली. याबैठकीला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, कोरोनाचे संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात 144, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन विनाकारण होणारी हालचाल थांबवली पाहिजे. तलाठी, ग्रामसेवक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचीही पोलीसांच्या बरोबर अशा अवैध कारणासाठी विनाकारण होणारी हालचाल थांबविण्याची जबाबदारी आहे.
लसीकरणात जिल्हा आघाडीवर आहे. काही गावांचे 100 टक्के लसीकरण झाले आहे. त्या सर्वांचे कौतुक करतो, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरणावर अधिक भर द्यावा. हर्ड इम्युनिटी तयार होईल. यात सर्वांचा सक्रीय सहभाग व्हावा. कोव्हिड प्रतिबंधक प्रोटोकॉल पाळत नसणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अत्यावश्यक सेवेतील क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर नियमांचे पालन होत नसेल तर अशा दुकांदारांवर तसेच व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. वारंवार नियमांचे उल्लंघन करणारे दुकान बंद करावे.
भाजीपाला विक्रेते यांचेही लसीकरण करणे आवश्यक आहे. त्याबाबत नियोजन करा. मंगल कार्यालयामध्ये नियमांचे पालन होत नसेल तर त्याबाबत कारवाई करावी. प्रसंगी बंद करण्याची कारवाईही करा. अत्यावश्यक सेवेशी निगडीत उद्योग, निर्यातक्षम उद्योग, सातत्याने प्रक्रिया असणारा उद्योग आणि ज्या उद्योगाच्या परिसरात कामगार राहायला आहेत, असे उद्योग सुरु असणार आहेत. याठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. अशा ठिकाणी कर्मचारी पॉझिटिव्ह सापडला तर उद्योग बंद करुन ते निर्जंतुकिकरण करुन इतर कर्मचाऱ्यांची चाचणी करणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. माने म्हणाले, काँन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा. ग्राम समित्या सक्रिय कराव्यात. गावात येणाऱ्या तसेच बाहेर जाणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण हवे. पॉझिटिव्ह रुग्णांची यादी सरपंच, ग्रामसेवक यांना द्यावी. जेणेकरुन रुग्ण घरा बाहेर फिरणार नाहीत याबाबत नियंत्रण ठेवता येईल.
पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे म्हणाले, संचारबंदीची अंमलबजावणी चांगली झाल्यास यशही चांगले मिळेल. इचलकरंजीमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर चांगली कारवाई झाली आहे. अशीच कारवाई अन्य ठिकाणीही होणे अपेक्षित आहे. तहसिलदार, गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी एकत्र येवून नियोजन करावे. जेणेकरुन अडचणी समस्या सुटण्यास सोपे होईल. सध्या यात्रांचे दिवस सुरु होत आहेत त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. सर्व सामान्य गरिबांना कारवाईचा त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.
महापालिका डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी आदेशाची कडक अंमलबजावणी करावी. त्याबाबत दक्षताही घ्यावी. कचरा उचलणे, साफसफाई, निर्जंतुकीकरण यावरही भर हवा. मास्क वापरणे, नियमांचे पालन करणे, उल्लंघन करणाऱ्यावंर दंडात्मक कारवाई करणे याचेही अंमलबजावणी करावी.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks