नियमबाह्य कामातून निधीवर डल्ला मारणाऱ्या ठेकेदारांची बिले अदा करु नका. : भाजपच्या कार्यकर्त्यांचे मुख्याधिका-यांना निवेदन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल नगरपरिषदेच्या निधीतून नियमबाह्य,खोटी व बोगस कामे झाली आहेत.नियमबाह्य कामातून निधीवर डल्ला मारणाऱ्या ठेकेदारांची बिले अदा करण्यात येऊ नयेत. असे निवेदन भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांना दिले आहे.
निवेदनातील मजकूर असा….कागल नगर परिषदेकडे विविध मथळ्याखाली नगर परिषदेच्या व शासनाच्या माध्यमातून विकास कामे झाली आहेत. यामध्ये खोटी बिले सादर करणे, विना निविदा काम करणे, निविदा पेक्षा जास्त निधी वाढवून घेणे, निविदा पेक्षा जास्त रक्कम उचलणे, निविदेतील अटी शर्तींचा भंग करून संपूर्ण रक्कम उचलणे, शासन निर्देशाचा भंग करून कामे करणे अशी नियमबाह्य स्वरूपाची कामे करणारी ठेकेदारांची टोळी नगरपरिषद अंतर्गत कार्यरत आहे. त्यांना राजकीय सत्ताधाऱ्यांचे पाठबळ आहे. विशेष म्हणजे येथील काही ठेकेदार ईडीचे चौकशीतील आरोपी देखील आहेत. त्यांच्याकडून झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या अपहाराची चौकशीही सुरु आहे. यापूर्वीचे मुख्याधिकारी श्रीराम पवार यांनी या भ्रष्ट ठेकेदारांची दिले मंजूर केलेली नाहीत. जनतेचा कर व शासनाच्या निधीची लूट होऊ नये,यासाठी नव्याने हजर झालेल्या मुख्याधिकारी यांनी ही या ठेकेदारांची नियमबाह्य व चुकीची बिले देऊ नयेत. अन्यथा याबाबत कायदेशीर लढा उभा केला जाईल. असा इशारा निवेदनातून दिला आहे.
निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, भाजपचे शहराध्यक्ष सुशांत कालेकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासो जाधव, शाहूचे संचालक यशवंत माने, सतीश पाटील, राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, संचालक राजेंद्र जाधव, उमेश सावंत ,धैर्यशील इंगळे ,विवेक कुलकर्णी ,अमन आवटे, रमीज मुजावर, यांच्या सह्या आहेत.
जनतेच्या व शासनाच्या निधीची लय लूट होऊ नये म्हणून निःपक्षपातीपणे काम करा…..
जनतेच्या व शासनाच्या निधीची लय लूट होऊ नये म्हणून मुख्याधिकारी साहेब निःपक्षपातीपणे काम करा
राजकिय दबाव न घेता काम करा.अन्यथा चुकीच्या कामाबाबत जनआंदोलन ऊभा करु असा सूचक इशारा ही निवेदनातून दिला आहे.