घरकुलांचा गृहप्रवेश हा जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण ; ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक प्रतिपादन कागलच्या गणेश नगरमध्ये एक हजार घरकुलांचे वाटप.

कागल, प्रतिनिधी :
घरकुल संकुलामध्ये गोरगरिबांचा ग्रहप्रवेश हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, असे भावनिक उदगार ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. पुण्याई ही शिदोरी संपूर्ण आयुष्यभर पाठीशी राहील, असेही ते म्हणाले.
कागल शहरातील गणेश नगरमध्ये नागरिकांना एक हजार घरकुलांचे वाटप मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प तडीस नेला आहे. बाजार मूल्यानुसार बारा ते पंधरा लाख रुपये किंमत होणाऱे हे घरकुल अवघ्या ५० हजारात मिळाले आहे. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. माणिक रमेश माळी होत्या.
संकुलातील नागरिकांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांचे टेरेसवरून पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत केले. घरकुल संकुला समोरील गुढीचे पूजन मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले व घरकुलातील नागरिकांसोबतच मंत्री श्री. मुश्रीफ यांनीही पुरणपोळीचा आनंद लुटला.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागल शहरात राहणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे स्वप्न बघितले होते. या घरकुलात राहून मुलाबाळांचे चांगले शिक्षण पूर्ण करा आणि जीवनमान उंचवा. राहिलेली अडीचशे घरेही दसऱ्यापर्यंत पूर्ण करून देऊ.
ते पुढे म्हणाले, रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातूनही एक हजारावर घरे पूर्ण झाली आहेत. म्हाडाच्या माध्यमातून कागलच्या सुपुत्रांना वीस लाखापर्यंतचे घर देणार अवघ्या पाच लाखात घरी देऊ. यापुढेही भाड्याने राहणाऱ्या तसेच कमी जागेमुळे अडचणीत राहणार्यांना दोन हजारावर कुटुंबांना देणार आरसीसी घरे देणार आहोत.
“दसऱ्याला छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत कार्यक्रम………”
“मंत्री मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे गोरगरिबांचे दीनदलितांच्या आधारवड होते. त्यांचे वारसदार असलेले छत्रपती शाहू महाराजांनी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यावे, अशी माझी इच्छा होती. परंतु; कोरोना परिस्थितीमुळे ती पूर्ण झाली नाही. येणाऱ्या काळात छत्रपती शाहू महाराजांना या विभागात आणू आणि येणाऱ्या दसऱ्यात महाराज गोरगरीब आणि दिन- दलितांच्या पंगतीला बसून जेवतील, असा आशावादही श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केला.”
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, आजचा हा गुढीपाडवा कागल शहरातील गोरगरिबांच्या जीवनातील सोन्याचा दिवस आहे. चार वर्षांपूर्वी गोरगरिबांच्या घराची ही चळवळ विरोधकांनी थांबविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु; आम्ही डगमगलो नाही.
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, घरकुल योजना पूर्णत्वास नेणारी कागल ही राज्यातील एकमेव नगरपालिका आहे. या संकुलात गुण्यागोविंदाने नांदा.
माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी म्हणाले, कागल नगर परिषदेच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण आहे. या घरकुल संकुलामुळे राहणीमान सुधारून भावी पिढी चांगली बनेल.
माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठबळामुळेच घरकुलाचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. ५० हजारात आरसीसी घरकुल देणारी कागल नगरपालिका ही एकमेव आहे.
यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, माजी उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेविका नूतन गाडेकर, नगरसेविका सौ. माधुरी मोरबाळे, नगरसेवक विवेक लोटे, संग्राम लाड, मुख्याधिकारी पंडित पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार सौरभ पाटील यांनी मानले.