ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापुरात दहा सप्टेंबरला राष्ट्रवादीची उत्तरदायित्व सभा ; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची माहिती

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कोल्हापुरात रविवारी दि. १० सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भव्य उत्तरदायित्व सभा होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजितदादा पवार यांचा सत्कार यावेळी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रांताध्यक्ष असलेले माजी मंत्री, माजी खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तपोवन मैदानावर सायंकाळी चार वाजता होणाऱ्या या सभेला ५० हजाराहून अधिक उपस्थिती असेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. ए. वाय. पाटील यांनी दिली आहे. या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.

श्री. ए. वाय. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, प्रलंबित प्रश्न निकालात काढण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे योगदान मोठे आहे. भविष्यातही कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचे योगदान मिळेल, अशी अपेक्षा आहे.

या पत्रकात म्हटले आहे, तीन दिवसांपूर्वी आमचे दैवत व नेते शरद पवारसाहेब यांची सभा कोल्हापुरात झाली. त्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा नाही. नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कोल्हापुरात आले होते. परंतु; आम्ही त्यांचा सत्कार करू शकलो नव्हतो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत. भविष्यातही कोल्हापूरसह जिल्ह्याचे विकासकामांचे आणि प्रलंबित प्रश्न ते मार्गी लावतील, अशी आम्हाला आशा आहे.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, औषध व प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रुपाली चाकणकर या प्रमुखांसह राज्यभरातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks