21 ऑगस्ट रोजी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचा मेळावा; माजी खासदार राजू शेट्टी राहणार उपस्थित

कोगनोळी :
साखर संघाकडील माहितीनुसार गेल्या दोन वर्षात राज्यातील ऊस वाहतूकदारांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे. यामुळे अनेक ऊस वाहतूकदार कर्जबाजारी झाले तर काहींनी आत्महत्येचा पर्याय निवडला. ही रक्कम वसुलीच्या प्रयत्नात काहींचे खूनही झाले. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी महाराष्ट्रात नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात आली. कर्नाटकातील विजापूर भागातील मजूर महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातील बीड भागातील मजूर कर्नाटकात ऊस तोडीचे काम करतात. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही मुकादमांच्या फसवणुकीबाबत कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. यासाठी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेच्या वतीने सर्वेज्य सांस्कृतिक भवन, दत्त देवस्थान मठ, आडी येथे 21 ऑगस्ट रोजी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
कर्नाटकातील सर्व कारखान्यांमध्ये एकाच प्रकारचा करार, यामध्ये वाहतूकदार, कारखाना व मजूर या तिघांचाही समावेश, मुकादम व मजूर हे नोंदणीकृत असावेत याबरोबरच कर्नाटकात ऊस वाहतूकदारांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.
यावेळी संदीप राजोबा, रावसाहेब आबदान, राजू पाटील, वसंत प्रभावळे, विठ्ठल पाटील, प्रवीण शेट्टी, गुंडू पाटील, संदीप मिस्त्री यांच्यासह ऊस तोडणी वाहतूकदार उपस्थित होते.