लळा लागलेल्या ‘ गौरी ‘ च्या अंत्यसंस्काराला सारा गाव झाला गोळा….! बोरवडेतील साठे कुटूंबियांनी लाडक्या कुत्र्याचे विधिवत केले अंत्यसंस्कार

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके
मालकाच्या घरातील कुटूंबियांपासून ते गल्लीतील अबालवृद्ध सर्वांनाच लळा लागलेल्या बोरवडे ( ता. कागल ) येथील साताप्पा साठे यांच्या मालकीच्या ‘ गौरी ‘ नावाच्या कुत्रीचा आकस्मिक झालेला मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला. साठे कुटूंबियांनी लाडक्या गौरीचे विधिवत केले अंत्यसंस्कार केलेच ; शिवाय तिसऱ्या दिवशी फोटोपूजन व तिचे उत्तरकार्यही केले. सर्वांना जिव्हाळा लावलेल्या ‘ गौरी ‘ च्या अंत्यसंस्काराला गल्लीसह गावातील ग्रामस्थ तर उत्तरकार्याला पै-पाहुणेही आवर्जुन उपस्थित होते.
बोरवडेच्या भगतसिंग गल्लीत राहणाऱ्या साताप्पा साठे यांच्या घरात इराणी जातीची चार वर्षे वयाची गौरी नावाची कुत्री होती. लहान असल्यापासून तिने सर्वांना लळा लावल्याने साठे पती-पत्नीसह त्यांच्या मुलांनाही ती घरच्या सदस्यांपैकी एक वाटायची. घरचे शेताकडे निघाले की ती सर्वांच्यापुढे असायची. घरासह गल्लीतील लहान मुलेही गौरीसोबत खेळायची. परंतु तिने कधीही कोणाला आपल्यामुळे त्रास दिला नाही. यांमुळेच ती सर्वांची लाडकी बनली होती.
परंतु वीस दिवसांपूर्वी गौरी अचानक आजारी पडली. तिचे खाणे-पिणे कमी झाले. त्यामुळे तिची तब्येत बिघडली. साताप्पा साठे यांनी तिच्यावर गावातील जनावरांच्या डॉकटरांकडून उपचार करुन घेतले. परंतु तिच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. डॉक्टरांनी त्यांना भुदरगड तालुक्यातील कडगाव येथे गौरीला उपचारांसाठी नेण्यास सुचवले. साताप्पा यांनी सलग दहा दिवस मोटरसायकलवरुन गौरीला औषधोपचारासाठी कडगावला नेले. दररोजचा खर्च साधारणपणे दीड हजार रुपयांचा होता. जवळपास वीस हजार रुपये खर्च होऊनही शुक्रवारी रात्री गौरीला अखेर मृत्यूने गाठलेच.

गौरीचा आकस्मिक मृत्यू घरातल्यांसह शेजारी-पाजार्यांनाही धक्कादायक होता. तिच्या मृत्यूनंतर घरातल्यांनी त्यांच्या विवाहित मुलींना आणि नोकरीनिमित्त पुणे येथे असलेल्या मुलालाही निरोप दिला. मुली रात्रीच दाखल झाल्या तर मुलगा सिद्धेश यांने आपण आल्याशिवाय गौरीवर अंत्यसंस्कार करु नयेत असा निरोप दिला. शनिवारी दुपारी सिद्धेश आल्यावरच घरच्यांनी गौरीवर विधिवत अंत्यसंस्कार केले. तर तिसर्या दिवशी म्हणजे रविवारी गौरीचे फोटोपूजन व उत्तरकार्यही केले.
गौरीचा आकस्मिक मृत्यू साठे कुटूंबियांसह सर्वांनाच दुःखात लोटणारा आहे. परंतु साठे कुटूंबियांनी घरचा माणूस गेल्याप्रमाणे तिचे सर्व सोपस्कार पार पाडून या मुक्या जनावराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. एकीकडे घरच्या व नातेवाईकांतील रक्ताच्या नात्यांमध्ये विविध कारणांनी दुरावा निर्माण होत असताना त्यांनी गौरीबद्दल दाखविलेल्या जिव्हाळ्यातून आजही माणूसकी जिवंत असल्याचे साठे कुटुंबियांनी दाखवून दिले आहे