पोलिस उपनिरीक्षकाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर

टीम ऑनलाईन :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) शनिवारी (ता. १६ एप्रिल २०२२) पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पूर्व परीक्षा २०२१ मधून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल गुरुवारी (ता. ९) जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत पदासाठी पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जातील माहितीच्या आधारे पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल. या पदाची मुख्य परीक्षा ३ जुलै रोजी नियोजित होती. मात्र, परीक्षेची सुधारित दिनांक प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहिरात विभागाकडून आयोगाच्या संकेतस्थळावर (MPSC) स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेचा निकाल मा. न्यायालयात/मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध केला आहे.
पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेजद्वारे कळविण्यात येईल. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील.