मुंबई कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह पालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा

मुंबईमधील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडणेकर यांच्यासह महापालिकेचे दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्ह्याची नोंद झाली आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.
कोरोना महामारीच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचं अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचं म्हणणं आहे. यामध्ये किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग होता, असं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे पेडणेकर यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉडी बॅग खरेदीत घोटाळा
मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग 2000 रुपयांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सुचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या.