कृषी विभागाने अभ्यास करून कमी खर्चातील छोटा ॲक्वाफोनिक मॉडेल तयार करावे – कृषीमंत्री दादाजी भुसे

कोल्हापूर, : रोहन भिऊंगडे
हातकणंगले येथे पाण्यावरील तरंगती ॲक्वाफोनिक अधुनिक तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग ललित झंवर व मयंक गुप्ता यांनी केला आहे. सामान्य शेतकऱ्याला कमी खर्चात हे नवे तंत्रज्ञान देण्यासाठी कृषी विभागाने अभ्यास करून छोटे मॉडेल तयार करावे, अशी सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज केली.
हातकणंगले येथील लँड क्रॅप्ट ॲग्रो येथे रिसोर्स बँक शेतकरी सुसंवाद कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, नगराध्यक्ष अरूण जानवेकर, पंचायत समिती सभापती प्रदीप पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील आदी उपस्थित होते.
या प्रकल्पाची पाहणी करून कृषी मंत्री श्री. भुसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, पारंपरिक शेतीला फाटा देत सुमारे अडीच एकर क्षेत्रावर पाण्यावर (ॲक्वाफोनिक) तरंगत्या शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याच्या उत्पादित शेतमालाला चांगली बाजारपेठ, चांगली किंमत मिळण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’ ही योजना आणली आहे. शेतकऱ्यांच्या कष्टााला, घामाला दाम देताना पाठिमागे बघू नका. दोन पैसे जादा गेले तरी शेतकऱ्यांचा आशिर्वाद मिळेल, असे ते म्हणाले.
महापुरामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे झालेल्या पॉलीहाऊसबाबत नुकसान भरपाई देण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडे सकारात्मक निर्णय होण्याबाबत पाठपुरावा केला जाईल. जिल्ह्यात चहा उत्पादक प्रकल्प राबविण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि ज्या भागात हा प्रयोग होत आहे तेथील उत्पादक प्रतिनिधी यांचा अभ्यास गट स्थापन करून चालना दिली जाईल. यंदाच्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची कमतरता भासणार नाही. दीड ते दोन लाख टन युरियाचा बफर स्टॉक कृषी विभागाकडे करत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध होणार आहे. रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे. त्याचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. त्यासाठी चालू वर्षी त्याबाबत 10 टक्के कमी वापर करण्याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेची 1 लाखापर्यंत असणारी मर्यादा ही 3 लाखावर करण्यात आली आहे. या योजनेत नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्यांना 0 टक्के व्याजदर असणार आहे. शेतीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी पुन्हा एकदा सर्वजण मिळून काम करू, असेही ते म्हणाले.
खासदार श्री. माने म्हणाले, शेतकऱ्याच्या अडचणी संपून तो उद्योजक व्हावा या भावनेतून विकेल ते पिकेल ही संकल्पना आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही उत्क्रांती घडवून आणली आहे. महापूर, कोरोना यामुळे शेतकऱ्यावर संकटं आली. त्याला आधाराची गरज आली. प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे. माजी आमदार डॉ. मिणचेकर आणि श्री. पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी एकरी 13 क्विंटल सोयाबीन घेणाऱ्या महिला शेतकरी अनिता कुंभार यांचे कृषी मंत्र्यांनी कौतुक केले. निंबराज नाईक-निंबाळकर, विश्वनाथ पाटील, श्रीमती कुंभार, मोहन कदम या शेतकऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.