केंद्राने २५ वर्षावरील सर्वाना लस द्यावी मंत्री हसन मुश्रीफ यांची आग्रही मागणी कागलमध्ये बैठकीत घेतला कोरोना व लसीकरणाचा आढावा

कागल प्रतिनिधी :
केंद्र सरकारने २५ वर्षावरील सर्वांनाच लस उपलब्ध करून द्यावी व ही लस बाजारात कुठेही उपलब्ध झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. दरम्यान; कोरोना संसर्गाचा कहर वाढतच असल्यामुळे या परिस्थितीशी लढण्यासाठी जय्यत तयारी ठेवूया, असे आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी केले.
कागलमध्ये अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी कोरोना संसर्गाचा व लसीकरणाचा सविस्तर आढावा घेतला.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, ब्राझील, अमेरिके पाठोपाठ कोरोना संसर्गात भारताचा नंबर लागतो. त्यामध्येही महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. केंद्राने भेदाभेद व राजकारण न करता लस उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणीही श्री. मुश्रीफ यांनी केली. कोरोना संसर्गाशी लढताना व लसीकरण मोहिमेत कोणतीही अडचण उद्भवल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क साधा, मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे.
ग्रामसमित्या व प्रभाग समित्यांनी सज्ज रहावे, असे आवाहनही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले.
“निष्ठेचे व कष्टाचे फळ………….”
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ग्रामविकास खाते माझ्याकडे असतानाही मला कामगार मंत्रीपदाचा कार्यभार मिळाला. एखाद्या नेत्यावर आणि पक्षावर जर असीम निष्ठा असेल आणि त्यांच्यावर जर आपण जीव ओतून निस्सीम प्रेम केलं. तसेच, संपूर्ण आयुष्य पणाला लावून जर गोरगरीब जनतेची सेवा केली, उद्देश निस्पृह आणि प्रामाणिक असेल तर त्या कष्टाचे फळ किती गोड असते, याचीच ही प्रचिती आहे.
बैठकीला तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे, सहाय्यक गटविकास अधिकारी आप्पासाहेब माळी, कागलचे नगर अभियंता सुनील माळी आदी अधिकारी उपस्थित होते.