राज्यात ५० हजार शिक्षकांची भरती होणार : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

राज्यात लवकरच शिक्षक भरती होणार असून, पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. राज्यात एकूण ५० हजार शिक्षकांची भरती होणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याने शिक्षक भरतीचे काम रखडले होते, असे मंत्री दीपक केसकरांनी सांगितले.
आगामी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच ही शिक्षकांची भरती करण्याचा आमचा मानस आहे. यात पहिल्या टप्प्यात ३० हजार तर दुस-या टप्प्यात २० हजार शिक्षकांची भरती केली जाईल. त्यासाठी जीआर काढण्याची प्रक्रियाही आजच केली जाईल. शंभर टक्के शिक्षक भरती करण्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. अशा उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची भरती करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
शरद पवारांच्या ट्विटची दखल
दीपक केसरकर म्हणाले की, रिटायर होणा-या शिक्षकांकडून काम करून घेतले जाणार आहे. जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळा शिक्षक भरती होणार असल्याचे ते म्हणाले. शिक्षणाचा दर्जा खालावल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले होते. याची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असेही यावेळी केसरकर म्हणाले.