राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ. शीतल फराकटे यांची निवड

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट ) कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षपदी फराकटेवाडी ( ता. कागल ) येथील सरपंच सौ. शीतल रोहित फराकटे यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र पाठवले आहे. सौ. फराकटे यांनी याआधी युवती आणि महिला जिल्हाध्यक्षा पदाची जबाबदारी सांभाळली असून पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे.
या निवडीविषयी बोलताना सौ. शीतल फराकटे म्हणाल्या, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,जिल्ह्याचे नेते आणि नुतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. जिल्ह्यातील माता-भगिनींचे विशेषत: युवतींचे संघटन करुन पक्षवाढीसाठी आपण प्रयत्नशिल राहणार आहोत.
या निवडीकामी जिल्ह्याचे नेते नामदार हसन मुश्रीफ व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख नेतेमंडळी यांचे सहकार्य लाभल्याचे सौ. शीतल फराकटे यांनी सांगितले.