कागल तालुक्यातील साके येथे अज्ञाताकडून २० गुंठे झेंडू फूलशेतीवर विषारी द्रव्याची फवारणी

कागल :
कागल तालुक्यातील साके येथील शेतकरी दिग्विजय तानाजी पाटील यांनी २० गुंठ्यांत झेंडू फूलशेती केली आहे. बुधवारी अज्ञात व्यक्तीने या संपूर्ण झेंडूबागेवर विषारी द्रव्याची फवारणी केली आहे. यामुळे सर्व झेंडूबाग करपून गेली आहे. यातून या शेतकऱ्याचे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, साके येथील शिवारात ‘गेरवाट’ नावाच्या शेतात पाटील यांनी ही बाग केली आहे. सध्या ही फुले चांगली बहरली आहेत. त्याची तोडणी करण्यापूर्वी अज्ञात व्यक्तीने शेतात कुणी नसल्याचे पाहून संपूर्ण झेंडूबागेवर विषारी द्रव्याची फवारणी केली आहे. यामुळे संपूर्ण बाग करपून गेली आहे. या शेतकरी कुटुंबाने मोठ्या कष्टाने वाढवलेली ही झेंडूफुले करपून गेल्यामुळे संपूर्ण कुटुंबच हादरून गेले आहे. झेंडू फुलांना चांगली मागणी व दरही चांगला आहे. याबाबत अज्ञाताविरोधात कागल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. झालेल्या नुकसानीचा ग्रामसेवकांनी पंचनामा करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.