परदेशातील उच्च शिक्षणासाठी मौजे सांगावच्या ऋचिताला केडीसीसी बँकेचे २५ लाखांचे अर्थसहाय्य ; लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट ऑफ इंग्लंड ब्रिस्टल युनिव्हर्सिटीमध्ये घेणार उच्च शिक्षण

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मौजे सांगाव ता. कागल येथील कु. ऋचिता संभाजी पाटील हिला शैक्षणिक कर्जापोटी परदेशातील ऊच्च शिक्षणासाठी केडीसीसी बँक २५ लाख रुपयांचा अर्थपुरवठा करणार आहे. लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट ऑफ इंग्लंड ब्रिस्टल युनिव्हर्सिटीमध्ये ती उच्च शिक्षण घेणार आहे. तिथे ती इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये एम.एस.सी. हे पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मौजे सांगाव येथील संभाजी महादेव पाटील व सौ. मनीषा यांचे सर्वसामान्य शेतकरी दांपत्याची ऋचिता आणि प्रणव ही दोन मुले. शेतात काबाडकष्ट करून आणि भाजीपाला पिकवून हे कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी धडपडत आहे. चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलामध्ये घेतलेल्या ऋचिताचे माध्यमिक शिक्षण आंबोलीच्या आंबोली पब्लिक स्कूलमध्ये झाले. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील पदविका उचगांवच्या न्यू पॉलिटेक्निकमधून व इचलकरंजीच्या डीकेटीईमधून बी.टेक. इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी घेतली.
संभाजी पाटील म्हणाले, केडीसीसी बँक सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या मुलीच्या खर्चासाठी २५ लाख रुपयांचा प्रश्न माझ्यासमोर होता. केडीसीसी बँकेच्या पाठबळामुळेच मुलीच्या परदेशातील उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार होत आहे. बँकेचे अध्यक्ष मंत्री हसनसाहेब मुश्रीफ, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराजबापू पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी मोलाचे पाठबळ दिले.
कु. ऋचिता पाटील म्हणाली, माझ्या शैक्षणिक वाटचालीत डी.के टी.ई.चे. संस्थापक माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडेदादा, मानद सचिव सौ. सपना आवाडे, प्राचार्य एल. एस. आडमुठे, विभाग प्रमुख प्रा. आर. एस. पाटील या गुरुजनांचे योगदान मिळाले.