कोल्हापुरात तब्बल 8 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त; उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज-आजरा रोडवर हिरलगे फाट्यावर हिरलगे गावच्या हद्दीत (ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर) तब्बल आठ लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. दारू वाहतूक करणाऱ्या वाहनासह 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने केली. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
काल (21जून) पहाटे तीनच्या सुमारास दोन व्यक्ती महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ कारमधून (MH-07-J-0335) बेकायदापणे गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी मद्याची वाहतूक करीत असताना दोघे सापडले. जिल्हा भरारी पथकाने त्यांना नाव, पत्ता विचारले असता अनंत अरुण मेस्त्री (वय 30 रा. खासकीलवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, आणि रमेश तिकोडे (रा. मडिलगे ता. भुदरगड जि. कोल्हापूर) (संशयित व्यक्ती) अशी नावे सांगितली.
12 लाखांचा मुद्देमाल जप्त
स्कॉर्पिओमध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्याने भरलेले अॅड्रील क्लासिक व्हिस्की 750 मिलीचे 119 बॉक्स इतके मद्य मिळून आले. स्कॉर्पीओ वाहनासह एकूण किमत रूपये 11,99,680 रुपये इतकी आहे. निव्वळ मद्याची किंमत 7,99,680 रुपये इतकी आहे. सदर गुन्ह्यामध्ये त्यांच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का? याबाबत तपास सुरू असल्याचे पथक प्रमुख निरीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले. सदर कारवाईत कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक, गिरीशकुमार कर्चे, जवान राजेंद्र कोळी, विशाल भोई, सचिन लोंढे यांनी सहभाग घेतला.