खिंडवाडी येथील बाजार समितीचे काम लवकरच पूर्ण करणार :आ. शिवेंद्रसिंहराजे ; उदयनराजेंना सातारच्या विकासात आडवे पडण्याची सवय

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
सातारा- खिंडवाडी येथे सातारा कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुल व उप बाजार या वास्तूची उभारणी होत आहे. सदरची जागा कायदेशीररित्या बाजार समितीच्या मालकीची आहे. बाजार समितीच्या या नवीन कामाचे भूमिपूजन विधिवत केले असून लवकरच बाजार समितीचे काम पूर्ण केले जाईल, असे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले असून सातारच्या विकासात आडवे पडण्याचे काम खासदार उदयनराजे नेहमीच करत असतात. सवयीप्रमाणे आजही त्यांनी विकासकामात अडथळा आणला असून अडथळा आणणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
सातारा बाजार समितीची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली असून यामध्ये आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पॅनेलने विरोधी पॅनेलचा धुव्वा उडवला होता. दरम्यान, सातारा शहरात बाजार समितीची जागा पुरेशी नसल्याने आणि व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी बाजार समिती खिंडवाडी येथील जागेत हलवण्याचा निर्णय बाजार समितीने यापूर्वीच घेतला होता. खिंडवाडी येथील जागा कायदेशीर लढाई जिंकून बाजार समितीने मिळवली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या मालकीच्या जागेवर स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुल व उप बाजार ही सुसज्ज वास्तू उभारण्याच्या कामाचा शुभारंभ आज आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि बाजार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी खा. उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांनी या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. स्वतः जनतेच्या हिताचे काही काम करायचे नाही आणि दुसरे कोणी करत असेल तर त्या कामात आडवे पडायचे हि खा. उदयनराजेंनी जुनी सवय आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे.
सातारच्या विकासात नेहमीच आडवे पडणाऱ्या उदयनराजेंनी आजही तोच प्रकार केला असून त्यांनी मुद्दामहून बाजार समितीच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही या कामाचे विधिवत भूमिपूजन केले आहे आणि लवकरच हे काम पूर्ण करू, असे आ. शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे.
खासदारांचा या जमिनीवर डोळा होता. त्यांना प्लॉटिंग करून हि जमीन विकायची होती, त्यांचा हा कुटील डाव धुळीस मिळाल्यानेच त्यांनी या विकासकामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.काहीही झाले तरी बाजार समितीचे काम पूर्ण केले जाईल. या विकासकामामध्ये मुद्दाम अडथळा आणणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.