हसन मुश्रीफ यांना एकवेळ किरीट सोमय्या परवडतील पण समरजितसिंह घाटगे नको अशी म्हणायची वेळ येईल : समरजितसिंह घाटगे ; एकोंडी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

सिद्धनेर्ली प्रतिनिधी :
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ किरीट सोमय्या यांना मी माहिती पुरविली म्हणताहेत.पण त्यांची कारकीर्दच भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. एक वेळ त्यांना किरीट सोमय्या परवडतील पण समरजितसिंह घाटगे नको अशी म्हणायची वेळ येईल. आता कागलमधील त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात यापुढची माझी लढाई असेल. असा थेट इशारा शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिला.
एकोंडी ता. कागल येथे विविध विकासकामांचे उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक होते.
श्री घाटगे पुढे म्हणाले,कागलचे मंत्री स्वतःला वडाचे झाड म्हणताहेत. मात्र ते वडाचे झाड नाहीत. वडाचे झाड तर स्व. राजे विक्रमसिंह घाटगे, स्व.सदाशिवराव मंडलिक व स्व बाबासाहेब कुपेकर ही मंडळी होती. या झाडांना विळखा घालून त्यांच्या आधाराने मोठे झालेले मंत्री हे जातीयवादी विषारी वेल आहेत.ती कापण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
वीरेंद्र मंडलिक म्हणाले,गोकुळमध्ये विश्वासघाताने झालेला माझा पराभव ही आमच्या गटाची भळभळती जखम आहे. राजे समरजितसिंह घाटगे व आमची चांगली मैत्री आहे. एकत्र येण्याच्या दृष्टीने आमची काही बिनसलेले नाही. त्याची मुहूर्तमेढ आज रोवली आहे.
यावेळी माजी उपसभापती विजय भोसले,शाहूचे संचालक प्रा.सुनिल मगदूम,आदर्श पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपिठावर सरपंच पूनम सुळगावे,उपसरपंच अक्षय चौगुले,शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी.पटील,प्रकाश पाटील,हिंदूराव मगदूम,दिलीप पाटोळे,रामचंद्र वैराटआदी उपस्थित होते.
स्वागत सुधीर पाटोळे यांनी केले.प्रास्तविक प्रकाश सुळगावे यांनी केले.आभार आनंदा बल्लाळ यांनी मानले.
राजे मंडलिक गट एकत्र येतील…..
यावेळी कागल तालुक्यात सुरू असलेल्या चुकीच्या राजकारणाचा संदर्भ देत विकासात्मक राजकारणासाठी राजे व मंडलिक गटाने एकत्र येणे काळाची गरज आहे. तालुक्यात ब-याच ठिकाणी तश्या आघाड्या झाल्या आहेत. त्यादृष्टीने एकोंडी मधील हा कार्यक्रम नांदी ठरणार आहे.अशा आशयाचे वक्तव्य पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय भोसले व शाहूचे संचालक प्रा. सुनील मगदूम यांनी केले.त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली