शेतकऱ्याकडून 5 हजार रुपये लाच घेताना विस्तार अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर मंजुरीचा प्रस्ताव मंजूर करुन विहिरीच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्याकरिता 5 हजार रुपये लाच घेताना नंदुरबार पंचायत समितीमधील विस्तार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. भैय्यासाहेब दिगंबर निकुंभे (वय-53) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई नंदुरबार एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि.19) पंचायत समिती कार्यालयाबाहेरील चहाच्या टपरीजवळ केली.
याबाबत रनाळे खुर्द येथील 55 वर्षीय शेतकऱ्याने नंदुरबार एसीबीकडे तक्रार केली आहे. यातील तक्रारदार यांचे रनाळे खुर्द शिवारातील शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर मंजुरीचा प्रस्ताव मंजूर करून विहिरीच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्याकरिता विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभे यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी याबाबत नंदुरबार एसीबीकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी 12 जून रोजी पडताळणी केली. त्यावेळी विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभे याने पाच हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी पंचायत समिती कार्यालयाबाहेरील चहाच्या टपरीजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकराताना नुकुंभे याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर ,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राकेश आ. चौधरी ,पोलिस निरीक्षक समाधान महादू वाघ ,पोलीस अंमलदार विजय ठाकरे, विलास पाटील, ज्योती पाटील,संदीप नावाडेकर, देवराम गावित, मनोज अहिरे, अमोल मराठे जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली.