ताज्या बातम्यामहाराष्ट्र

इचलकरंजी : महापालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार : उदय सामंत

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिकेतील गेल्या 10 वर्षांतील भ्रष्टाचाराची वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा करतानाच या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करू, तसेच आवश्यकता भासल्यास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही चौकशी केली जाईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी बुधवारी इचलकरंजी महापालिकेतील गेल्या 10 वर्षांतील भ्रष्टाचारावर लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवला. नगरपालिकेच्या काही शाळांमध्ये क्रीडांगण दुरुस्तीचे, शाळा दुरुस्तीचे काम दिले गेले; पण काहीही काम न करता काम पूर्ण झाले असल्याचे रेकॉर्ड करून धनादेशही दिले गेले.

यासंदर्भात तक्रार झाल्यानंतर पाचजणांची समिती नेमली गेली. तो गुन्हा सिद्ध झाला असून, खोटी बिले दिल्याचे समोर आले आहे. पाणीपुरवठा विभागातही 100 बोअरवेल नादुरुस्त झाले म्हणून बोअर आणले, असे दाखवले. गेल्या 10 वर्षांत या पालिकेत खूप मोठे गंभीर प्रकार घडले असून, काहीही काम न करता लुटण्याचे काम सुरू आहे, असा आरोप आवाडे यांनी केला.

मंत्री उदय सामंत यांनी आवाडेंनी केलेल्या आरोपांना दुजोरा दिला. आवाडे यांनी ज्यांची नावे घेतली त्या सर्वांवर तडीपारीसारखे गुन्हे दाखल आहेत, असे असताना खोट्या स्वाक्षर्‍या करून 18 लाखांची बिले त्यांनी वसूल केली आहेत, असे सामंत यांनी सांगितले. यासंदर्भात पालिका आयुक्तांनी पाचजणांची चौकशी समिती नेमली होती. त्यामध्ये काही अधिकार्‍यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

एफआयआरदेखील झाला आहे. आपण स्वत: पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली असून, एवढे मोठे गुन्हे असताना त्यांना अटक का झाली नाही, अशी विचारणा केल्याचे सांगत हे प्रकरण पोलिस अधीक्षकांनीही गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना अटक केली जाईल. परंतु, खोट्या सह्या कशा झाल्या, याचीही चौकशी करणार आहे. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि यापूर्वी नेमलेल्या समितीचा अहवाल घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks