पुणे : गुन्हे शाखेकडून गडचिरोलीमधून पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या युवकाला अटक; 7.25 लाखाचा गांजा जप्त

गडचिरोली येथुन पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक – 1 आणि खंडणी विरोधी पथक-1 ने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून 36 किलो 360 ग्रॅम वजनाचा 7 लाख 27 हजार 200 रूपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पंकज सलियार मडावी (23, रा. शिवगोरक्ष व्हिला, आंबेगाव-बुद्रुक, पुणे. मुळ रा. मुपो. मसेली, ता. कोर्ची, जि. गडचिरोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि. 18 जून 2023) अंमली पदार्थ विरोधी पथक-1 आणि खंडणी विरोधी पथक-1 मधील पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एक तरूण मोठया प्रमाणात गांजा विक्रीसाठी करत असल्याची माहिती पोलिस अंमलदार विजय कांबळे यांना मिळाली.
त्यापार्श्वभुमीवर पोलिस पथकाने पुणे इन्स्टिटयुट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी कॉलेज आंबेगावच्या विरूध्द दिशेला सापळा रचला. पोलिसांना तेथे पंकज मडावी हा दोन वेगवेगळया बॅगेत मोठया प्रमाणावर गांजा ठेवुन त्याची विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील 7 लाख 27 हजार 200 रूपये किंमतीचा 36 किलो 360 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. त्याच्याविरूध्द एनडीपीएस अॅक्टनुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्याला भा.वि. पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार , सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक ,अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे ,पोलिस उपायुक्त अमोल झेंडे , सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड ,पोलिस निरीक्षक अजय वाघमारे ,सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर , पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव ,पोलिस उपनिरीक्षक यशवंत ओंबासे , पोलिस अंमलदार विजय कांबळे,रविंद्र फुलपगारे, दुर्योधन गुरव, सुजित वाडेकर, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर आणि राजेंद्र लांडगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे