संभाजीनगर येथे महानगरपालिकेच्या टेम्पो आणि मोटारसायकलच्या अपघातात 4 वर्षाची बालिका ठार

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
संभाजीनगर येथे महानगरपालिकेच्या टेम्पो आणि मोटारसायकलच्या अपघातात चार वर्षाची बालिका ठार झाली. अन्वी विकास कांबळे (मूळ रा. वारे वसाहत, सध्या रा.रायगड कॉलनी) असे तिचे नाव आहे. अपघातात तिचे वडील ही जखमी झाले. संतप्त जमावाने टेम्पोवर दगडफेक केले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
याबाबत पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विकास दिलीप कांबळे सध्या रायगड कॉलनी येथे राहतात. त्यांचे वारे वसाहत येथेही घर आहे. ते खासगी शिकवणी घेतात. आज सकाळी ते मुलगी अन्वी सोबत वारे वसाहत येथील घरी आले होते. बाराच्या सुमारास ते मोटरसायकलवरून अन्वीला घेऊन रायगड कॉलनीकडे जात होते. त्याचवेळी संभाजीनगर मार्गे रेसकोर्सच्या दिशेने महानगरपालिकेचा एक टेम्पो जात होता. त्या टेम्पोचा आणि कांबळे यांच्या मोटरसायकलचा गॅस एजन्सीच्या समोरील रस्त्यावर अपघात झाला. यामध्ये टेम्पो खाली मोटारसायकल जाऊन अन्वी गंभीर जखमी झाली तर कांबळे यांच्या हाता पायाला दुखापत झाली.
ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये (CPR) दाखल केले. पण उपचारापूर्वीच अन्वीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच संतप्त जमावाने महापालिकेच्या टेम्पोवर दगडफेक करून तोडफोड केली. तसा तणाव निर्माण झाला. घटनास्थळी जुना राजवाडा पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. ती कांबळे कुटुंबाची एकुलती एक मुलगी होती.