विशेष लेख : ” वाघापूर ची जळ यात्रा”

शब्दांकनः – संदिप संभाजी पाटील (वाघापूर )
विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं च्या जयघोषात…. !
शेकडो धनगरी ढोलांच्या गजरात …..!
हजारो किलो भंडाऱ्याची उधळण करत कालपासून वाघापूर गावाचे दैवत श्री. विठ्ठल बिरदेव च्या त्रैवार्षिक जळ यात्रेस प्रारंभ झाला त्यानिमित्ताने……
“जळ म्हणजे जल , वेदगंगा नदीच्या पाण्याचे पूजन.. !”
कोल्हापूर शहरापासून दक्षिणेकडे अवघ्या ४५ – ५० किलोमीटर वर असणारे भुदरगड तालुक्यातील वेदगंगेच्या तीरावर वसलेले , समृद्धतेने नटलेले सांस्कृतिक ठेवा जपणारे कृषिप्रधान वाघापूर हे आमचे गाव .. ! आमच्या गावची जळ यात्रा दर तीन वर्षांनी होते.
.
“निघालो घेऊन माझा सबिना ह्यो… !”
.
शंकराचा अवतार समजला जाणार बिरदेव व पंढरीचा विठोबा एकत्रितरित्या दैवत म्हणजे विठ्ठल-बिरदेव होय. जळ यात्रेला शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा लाभली आहे. होळी नंतर येणाऱ्या दुसऱ्या शनिवारी यात्रेस प्रारंभ होतो ,
मुख्य जळ यात्रा ही रविवारीच केली जाते वाघापूर च्या पंचक्रोशीतील तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून , कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा अशा शेजारी राज्यातून लाखो भाविक भक्त या यात्रेस सहभागी होतात .
“सोडा खुट्टीच्या ढोलाची गाठ ..धरा वाघापूरच्या जळ यात्रेची वाट….!”
.
या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शेकडो ढोलांचा निनाद छत्र्या अबदागिरी धोरणांचा फिरा धनगरी ओव्या चा गजर बिरोबाच्या नावानं चांगभलं अशा जल्लोषी वातावरणात यात्रा साजरी केली जाते.
धनगरी ढोल वादक, छत्र्या, अबदागिरी तोरणे पालखी असा लवाजमा घेऊन भंडाऱ्याची उधळण करत रविवारी रात्री श्री ज्योतिर्लिंग देवालयाच्या भव्य मंडपात ढोलवादन -वालंग-भंडारा होतो.
हजारो किलो भंडाऱ्याची मुक्तपणे उधळणीमुळे वाघापूर चा मंदिर परिसर अक्षरशा पिवळाधमक सोन्याचा दिसू लागतो …!
देवाला आहुती म्हणून भक्तगण अंगात आल्यावर पोटावर तलवारी मारून घेण्याचा बनकर ( हेडाम) खेळ खेळला जातो तसेच ढोल वादन सह भंडाऱ्याची उधळण केली जाते रात्री दोन नंतर पालखी नदीकडे प्रस्थान करते नदीचे नदी जवळील बिरदेव मंदिरात मंदिराच्या समोर देवाला आहुती म्हणून दाताने बकरे तोडतात त्यानंतर कर देव व पुजारी वेदगंगा नदीच्या जलाची पूजा करतात…!
सोमवारी दुपारनंतर नदीजवळील बिरदेव मंदिराजवळ यात्रा भरली जाते , मानकरी- पुजारी भाकणूक करतात , भाकणूक म्हणजे काव्य स्वरूपातील भविष्यवाणी, त्यामध्ये विविध धार्मिक , सामाजिक व राजकीय गोष्टींवर भाष्य केले जाते . गावातील सर्वजण , पै पाहुणे , माहेरवाशिणी या यात्रेत उत्साहाने सहभागी होतात व विठ्ठल बिरदेवाचे दर्शन घेतात. मंगळवारी मुरगूडचा बाजार व रात्री देवाला बकर दिल जात व बुधवारी खारा नैवेध्द व म्हाई होते ..!!!
शब्दांकनः – संदिप संभाजी पाटील (वाघापूर )