जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता

मुंबई :
महाविकास आघाडीच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून आपणास मारहाण झाल्याचा आरोप अनंत करमुसे या तरूणानं केला होता. अनंतने वर्षभरापुर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. आव्हाडांना त्या पोस्टचा राग आल्यानं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगून त्यांच्या ठाण्याच्या बंगल्यावर मारहाण केल्याचा आरोप या तरूणानं केला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या सुनावणीदरम्यान कोर्टाने दिलेल्या एका निर्देशानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
आरोपात म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी तरूणाला मारहाण करण्यात आली त्यावेळी आव्हांडांच्या बंगल्यावर बंदोबस्तीसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) आणि एसडीआर (सबस्क्रायबर डेटा रेकॉर्ड) डिलीट करू नका, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहे. डेटा रेकॉर्डला एक वर्ष पूर्ण होत असून डेटा रेकॉर्ड नष्ट करण्यात येईल, असा मुद्दा याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून न्यायालयात उपस्थित केला होता, त्यावर न्यायालयाकडून डेटा रेकॉर्ड जतन करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
डेटा रेकॉर्ड जतन करण्याचा कालावधी रविवारी संपत आहे. या प्रकरणात सीडीआर आणि एसडीआर हा महत्वाचा पुरावा आहे. त्यामुळे कोर्टाने जर निर्देश दिले नाही तर हा पुरावा नष्ट होईल, असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. या प्रकरणात आरोपीविरूद्ध आरोपपत्र दाखल केलं गेलं असल्यानं यावर याचिकाकर्त्यांच्या बाजूने न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
दरम्यान, आव्हाडांचे कार्यकर्ते मारहाण करत असताना आव्हाड समोरच उभे होते. त्यांच्याच सांगण्यावरून मारहाण झाली असल्याचं तरूणानं म्हटलं आहे. मात्र या प्रकरणात आपल्याला काही माहिती नसल्याचं आव्हाडांनी म्हटलं होतं.