ताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसची ३ सप्टेंबरपासून राज्यव्यापी जनसंवाद यात्रा; लोकसभा निवडणुकीची तयारी

मुंबईतील इंडिया आघाडीची बैठक पार पडल्यानंतर काँग्रेसच्या वतीने ३ सप्टेंबरपासून राज्यव्यापी जनसंवाद यात्रा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून केंद्रातील व राज्यातील भाजपप्रणीत सरकारचा भ्रष्ट कारभार, महागाई, बेरोजगारी, या प्रश्नांवर जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर असे दोन दिवस होणार आहे. त्यानंतर ३ सप्टेंबरपासून राज्यात काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागवार यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण, उत्तर महाराष्ट्रात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, मराठवाडय़ात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पश्चिम विदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व पूर्व विदर्भात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघणार आहे. त्यानंतर कोकणात सर्व नेते एकत्रितपणे दोन दिवस या यात्रेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधरणार आहेत. साधारणत: तीन आठवडे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढण्यात येणार आहे.

जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुका कधीही झाल्या तरी त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी असून राज्यात सर्वाधिक जागा काँग्रेसलाच मिळतील, असा दावा नाना पटोले यांनी केला. दादर येथील टिळक भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, नसिम खान, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राहुल गांधी यांचा सत्कार
मुंबईत इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला होणार आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. १ सप्टेंबरला दुपापर्यंत बैठक संपेल, त्यानंतर राहुल गांधी प्रदेश कार्यालयाला भेट देतील, त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात येईल, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks