शाहू साखर कारखान्यामार्फत आठ ते अकरा आॕगष्ट दरम्यान मॕटवरील कुस्ती स्पर्धा : राजे समरजितसिंह घाटगे ; राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सलग ३९ व्या वर्षी आयोजन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शुक्रवार (ता.८) ते सोमवार (ता.११) या दरम्यान मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. उद्द्योन्मुख खेळाडूंना संधी व प्रोत्साहन मिळावे,या हेतूने राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. संपुर्णपणे ऑलंपिकच्या धर्तीवर सलग ३९व्या वर्षी स्पर्धा होत आहे. अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
ग्रामीण भागातील मल्लांना मॅटवरील कुस्तीचा सराव व्हावा, यामधील अद्यावत तंत्रज्ञान समजून त्यांनी ते आत्मसात करावे म्हणून स्पर्धा ऑलिम्पिक पद्धतीने आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार घेतली जाते. याचा फायदा अनेक मल्लांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये झाला आहे. कारखाना कार्यक्षेत्र (कागल, करवीर व हातकणंगले तालुका), उर्वरीत कागल तालुका, गडहिंग्लज शहर, उत्तूर व कडगाव- कौलगे जिल्हा परिषद मतदार संघ मर्यादित या स्पर्धा होणार आहेत.
बालगटातील स्पर्धकांची नांव नोंदणी व वजने शुक्रवार (ता.८), कुमार व ज्युनिअर गटातील स्पर्धकांची नांव नोंदणी व वजने शनिवार (ता.९) तर महिला व सीनियर पुरुष गटातील स्पर्धकांची नांव नोंदणी व वजने रविवार (ता. १०) सकाळी साडे आठ वाजता कारखाना साईट येथे घेण्यात येतील. प्रथम व द्वितीय क्रमांकासाठीची लढत वगळता अन्य लढती ज्या-त्या दिवशी होतील तर सर्व गटातील अंतिम लढती सोमवार (ता.११) सकाळी होतील. प्रत्येक वजनी गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. कारखाना साईटवर या स्पर्धा होतील.
स्पर्धेच्या ठिकाणी येऊ न शकणाऱ्या कुस्ती शौकीनांना घरबसल्या या स्पर्धा पाहता येण्यासाठी ‘महाखेल’ स्पोर्टस् पुणे कुस्ती हेच जीवन’या फेसबुक पेजवरून ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मल्लांनी स्पर्धेच्या नियम व अटींबाबत संयोजकांशी संपर्क साधून नावे नोंदवावीत असे आवाहनही त्यांनी केले.
स्पर्धा विविध ३८ वजनी गटांत….
या कुस्ती स्पर्धा विविध अडतीस वजनी गटांमध्ये होतील. त्यामध्ये चौदा वर्षाखालील बाल व सोळा वर्षाखालील कुमार गटामध्ये प्रत्येकी आठ गट, एकोणीस वर्षाखालील ज्युनियर गटामध्ये सात व सीनियर गटामध्ये पाच वजनी गटामध्ये या स्पर्धा होतील. तसेच महिला कुस्तीगिरांसाठी बाविस ते शहात्तर किलो अशा विविध दहा वजनी गटांमध्ये स्पर्धा होतील.