वीज बिल भरण्यासाठी हप्ते देणार: महावितरणची ‘आप’ला ग्वाही! वीज कनेक्शन तोडत आ. जाधव यांच्या सूचनांना महावितरणने दाखवली केराची टोपली, ‘आप’ने केला विरोध

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मागील 92 दिवस लॉकडाउन आहे. यामुळे वीज ग्राहकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा परिस्थितीत देखील ग्राहकांकडे वीज बिल वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. ग्राहकांकडे उपलब्ध असलेली रक्कम तूर्तास भरून घेऊन त्यांची वीज जोडणी खंडित करू नये, एखाद्या ग्राहकाकडे बिलाच्या 50% रक्कम भरण्याची क्षमता नसेल तर त्याला तगादा लावण्यात येऊ नये अशी मागणी आम आदमी पार्टीने महावितरणकडे केली होती.
यानंतर गुरुवारी आ. चंद्रकांत जाधव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. परंतु वीज कनेक्शन तोडत आ. जाधव यांच्या सूचनांना महावितरणने केराची टोपली दाखवली. धडक कारवाई करत वीज कनेक्शन तोडले जात असल्याचा तक्रारी ‘आप’कडे आल्या. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता डॉ. एन. आर. गांधले यांची भेट घेत वीज कनेक्शन तोडले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. जोपर्यंत तोडलेले कनेक्शन जोडत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालयातून हटणार नाही असा इशारा ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिला. वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकाला फोन करून प्रत्यक्षात असलेली परिस्थिती अधिकाऱ्यांना ऐकवली. यावर अभियंता गांधले यांनी नरमाईची भूमिका घेत ग्राहकांना हप्ते पाडून देण्यात येतील, तशा सूचना कर्मचाऱ्यांना देऊ अशी ग्वाही दिली.
यावेळी संदीप देसाई यांच्यासह युवाध्यक्ष उत्तम पाटील, संघटनमंत्री सूरज सुर्वे, आदम शेख, युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी, विशाल वठारे, राज कोरगावकर, बसवराज हदीमनी, विजय भोसले, रविराज पाटील आदी उपस्थित होते.