सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत राहणार : राजू पोवार ; रयत संघटना व हरित सेनेच्या कोगनोळी शाखेचे उद्घाटन

कोगनोळी प्रतिनिधी :
शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे संकट कोसळते, मालाला हमीभाव मिळत नाही, वीज बिलांची मात्र सक्ती केली जाते, अशा अन्नदात्या शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून निकराचा लढा देऊ, असे प्रतिपादन चिकोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार यांनी केले. ते कोगनोळी येथील रयत संघटना व हरित सेनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरुन बोलत होते. त्यांच्या हस्ते कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक नारायण पाटील यांनी केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजू पोवार पुढे म्हणाले, जगाचा पोशिंदा अन्नदाता त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. बाजारातील सर्वच मालाच्या किमती ठरलेल्या आहेत. परंतु शेतकऱ्याचा माल मात्र कवडीमोल दराने विकला जातो. त्याला रास्त हमीभाव मिळत नाही. परंतु त्याच्याकडून असलेले येणे मात्र सक्तीने वसूल केले जाते. या सर्व गोष्टींचा संघटित होऊन लढा दिला पाहिजे.
यावेळी युवा तालुका अध्यक्ष बाळासाहेब हदीकर, प्रवीण शितोळे यांच्यासह इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी कोगनोळी व परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.