ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोरंबेत स्वातंत्र्यदिनी विधवा माता -भगिनी फडकवणार अमृतमहोत्सवी तिरंगा ; ग्रामपंचायतीच्या विशेष बैठकीत एकमुखी निर्णय

गोरंबे प्रतिनिधी :

गोरंबे ता. कागल, जिल्हा- कोल्हापूर येथे सोमवारी दि. १५ भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी ध्वजारोहन समारंभ विधवा माता -भगिनींच्या हस्ते होणार आहे. त्यादिवशी सरपंच, उपसरपंचांसह सदस्यपदांचा मानसन्मानही विधवा माता -भगिनींना देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या विशेष बैठकीत एकमुखाने झाला. कोरोनाकाळात पतींचे निधन झालेल्या माता- भगिनी, तसेच निधन झालेल्या माजी सैनिकांच्या पत्नी यांचा या कार्यकारिणीमध्ये समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ग्रामपंचायतने गेले आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतीच्यावतीने घरोघरी तिरंगा ध्वजाचे वितरण, ग्रामसभा, अंगणवाड्यांमधील मुलांची बाळगोपाळांची पंगत, किशोरवयीन मुलींचा मेळावा, शालेय विद्यार्थ्यांसाठी मोबाईलच्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा, महिलांना रोजगार विषयक मार्गदर्शन व महिला जनजागृती उपक्रम, आजी-माजी सैनिकांचा सन्मान सोहळा, विद्यामंदिर शाळा व जवाहर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

दरम्यान; शनिवार दि. १३ रोजी सकाळी आठ वाजता उपसरपंच चंद्रकांत दंडवते यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. रविवार दि. १४ रोजी सकाळी आठ वाजता गावातील सर्व आजी-माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण व त्यानंतर सैनिकांचा सन्मान सोहळा होणार आहे.

ग्रामपंचायतीच्या या विशेष बैठकीला सरपंच सौ. शोभा पाटील, उपसरपंच चंद्रकांत दंडवते यांच्यासह दत्ता दंडवते, सिद्राम ढोले, सौ. सुमन गायकवाड, सौ. शाकुबाई ढोले, दिलीप सावंत, सौ. सुनीता पाटील, सौ. मालुबाई सुतार, सौ. सावित्री सुतार, सौ. बाळाबाई कांबळे आदी सदस्य व ग्रामसेवक अमोल चिखलीकर उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks