मूकबधिर शाळेस ई लर्निंग संच देणगीतून भोसले कुटूंबियांचे शाहू महाराजांना कृतिशील अभिवादन : सुहासिनीदेवी घाटगे ; समरजितसिंह घाटगेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भोसले कुटूंबियांनी दिली देणगी

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांनमध्ये बहुजनांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. त्यामुळे बहुजन समाजास शिक्षणाची द्वारे खुली झाली. मुंबईस्थित कागलच्या भोसले कुटुंबीयांनी मूकबधिर शाळेस ई लर्निंग संच देणगी देऊन शाहू महाराजांना कृतीतून अभिवादन केले. असे गौरवोद्गार शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा व राज्य साखर संघाच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.
कागल येथील राजे दिलीपसिंह घाटगे स्मृती निवासी कर्णबधिर विद्यालयास मुंबईस्थित कागलच्या पुष्पा भोसले व कुटुंबीयांनी देणगी दिलेल्या ई लर्निंग संचच्या लोकार्पणवेळी त्या बोलत होत्या. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा समारंभ घेण्यात आला.
श्रीमती घाटगे पुढे म्हणाल्या स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या अमृतमहोत्सवी जयंती निमित्त समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्यामार्फत ग्रामीण भागातील शाळांना ई लर्निंग संच देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अशा देणगीदारांची आता भर पडत आहे. ग्रामीण भागातील शाळेसह मूकबधिर शाळेतील मुलांना जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडी तसेच अभ्यासक्रमातील बारकावे शिकण्यासाठी या सुविधेचा फायदा होत आहे.
या वेळी संस्थेचे सचिव कर्नल दिलीपसिंह मंडलिक,संचालक विजय बोंगाळे, कर्नल शिवाजीराव बाबर एस.ए .कांबळे,उषा कुलकर्णी, मनोहर शिंदे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते .